प्रगतीचा एक्स्प्रेस वे म्हणजे मराठी युवकांना रिचार्ज करणारे पुस्तक - डॉ. नरेंद्र जाधव



मराठी उद्योजकांनी विशेषत तरुणांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडून आपली आíथक प्रगती केली पाहिजे. जुन्या मानसिकतेचा पगडा अजूनही अनेक मराठी लोकांवर आहे. ही कोती मनोवृत्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्याला हवा तेवढा वेग नाही. अशावेळी कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी लिहिलेले प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक म्हणजे तरुण मराठी उद्योजकांना अगदी योग्य वेळी रिचार्ज करणारे पुस्तक आहे, असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे सदस्य व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. जीवनरंग प्रकाशनने तयार केलेल्या प्रगतीचा एक्स्प्रेस वे या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जाधव, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष  मधु मंगेश कर्णिक, लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे सीएफओ वाय.एम. देवस्थळी यांच्या हस्ते ताजमहाल हॉटेलमध्ये काल झाले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव म्हणाले की गरिबीचे उदात्तीकरण मराठीत सर्वाधिक आहे. आपल्या काही म्हणीही गरिबीचेच समर्थन करतात. गरिबांनी गरीब राहावे म्हणून श्रीमंतांनी पसरवलेली ही अफवा आहे. खरे तर दारिद्ऱ्यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे  मनोदारिद्रय़. ते अगोदर दूर व्हायला हवे. म्हणून बदलत्या मराठी मानसिकतेची चर्चा करणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उद्योगात दूरदृष्टी आणि वेगळे काही करण्याची प्रेरणा आवश्यक असते.  उद्योजकात ऊर्जा आणि नवनिर्मितीची ऊर्मी असावे लागते. त्यात त्याच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचा कस लागत असतो. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळात महाव्यवस्थापक म्हणून काम करताना मला उद्योगक्षेत्रात जे अनुभव आले होते, त्याचा पुनप्रत्यय मला नितीन पोतदारांचे हे पुस्तक वाचताना आला. मराठी मनातील उद्योगाविषयीचा न्यूनगंड दूर होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे. या पुस्तकामुळे उद्योगाचा एक्प्रेस वे अधिक एक्स्प्रेस  होईल. उद्योगाच्या अखंडीकरणासाठी आणि सातत्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची चर्चा श्री. वाय. एम. देवस्थळी यांनी केली. ते म्हणाले की लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणारी दृष्टी उद्योजकाकडे हवी. सर्वोत्तमाचा ध्यास धरून त्याच्या पूर्ततेचा प्रयत्न करणे आणि सर्वसमावेशक व पारदर्शकता याच्या जोडीला आपल्या सहकाऱ्याचे कौतुक करण्याचे आणि आत्मपरिक्षण करण्याचे कसबही त्याच्यात असायला हवे.
या गोष्टी जर उद्योगात असतील तर कुटुंबाने चालविलेला उद्योग आणि व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून केलेला उद्योग यात फरक करता येणार नाही. या दोन उद्योगात फरक करणे मला मान्य नाही. मराठी माणूस उद्योगात कसा स्थीरावला आहे, याचे विवेचन  कुमार केतकर यांनी सहकारक्षेत्राचा हवाला देऊन केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात उद्योजकता नाही, असे नाही. तो एक न्यूनगंड आहे. आपल्याकडे अशिक्षित आणि अल्पशिक्षितांनीही शतकापूर्वी यशस्वी उद्योग केले आहेत आणि करीतही आहेत. पण आता नोकरीमुळे त्यांच्या अंगभूत गुणांवर बुरशी चढली आहे. ती बुरशी काढून टाकून त्याच्याखाली दडलेले सत्य जाणले पाहिजे.
पुस्तकाच्या प्रयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट करताना नितीन पोतदार म्हणाले की गेल्या २३ वर्षांत मी जागतिक स्तरावरचे अनेक उद्योगक्षेत्रातील घडामोडी जवळून पाहिल्या आहेत. त्यात जातीचा, भाषेचा प्रश्न कुठेच डोकावत नाही. एकतर उद्योजक असतो किंवा उद्योजक नसतो. मराठी माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही, असे सर्वेक्षण कोणी आणि केव्हा केले? चाकरमानीचा लेबल आपण स्वत:वर का लादून घेतो? येणारे शतक हे ज्ञानाधिष्ठीत असणार आहे. तेव्हा दोन दशकांसाठी तरी आपण आपले चुकीचे समज बाजूला ठेवूया आणि आताच्या महत्त्वाकांक्षी युवकांवर चाकरमानीचा शिक्का मारू नका. त्यांना फुलू द्या. कारण मराठी माणसाचा विश्वासाहार्यता हा ब्रण्ड आहे. हा ब्रॅण्ड पुढे नेण्याची गरज आहे. मला माझ्या क्षेत्रात आलेले अनुभव मी समाजापुढे ठेवले आहेत. आपणाला आलेले अनुभवही आपण तरुणांसमोर ठेवून मराठी उद्योजकांची एक पिढी निर्माण करायला हातभार लावू या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवनरंग प्रकाशनचे संजय गोविलकर यांनी त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की मराठी पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम जाणून ताजमहाल हॉटेलमध्ये घेण्यात आला. २६/११ च्या काळरात्रीनंतर आपण याच ठिकाणी पुन्हा भारतीय म्हणून एक झालो. त्याचा संदर्भ आणि उद्योगक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या टाटांच्या वास्तूत हा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुधीर गाडगीळ यांनी केले. यावेळी  द.म.सुकथनकर, एस.बी.आय.इन्सुरन्सचे अध्यक्ष  अशोक प्रधान, टाटा रिटेल इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष  दीपक देशपांडे, नंदकिशोर देसाई, कॅमलिनचे  सुभाष दांडेकर,  श्रीराम दांडेकर,  सचिन जकातदार,  सुनील रोहोकले, अनेय खरे,  उपेंद्र कुलकर्णी,  निखील नाईक,  नितीन  वेद्य,  उदय निरगुडकर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व उद्योगपतीं यावेळी उपस्थिती होते. प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक www.bookganga.com या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

0 comments:

Post a Comment

 
Jumbo... © 2010 | Designed by Trucks, in collaboration with MW3, Broadway Tickets, and Distubed Tour